साडेआठ महिन्यांत 501 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा

0
174

पिंपरी, दि.14 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाख मालमत्ता धारकांनी साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे ‘रेकॉर्ड ब्रेक’ अशी वसुली झाली आहे. तसेच उर्वरित मालमत्ता धारकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

शहरात 5 लाख 88 हजार मिळकतींची नोंद आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह 17 विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 3 लाख 1 हजार 434 मालमत्ता धारकांनी 501 कोटी 40 लाख रूपये कराचा भरणा केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 85 टक्के मालमत्तांचा टॅक्स वसूल करणे आवश्यक आहे.

शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाने दिल्या होत्या. तसेच तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत पाचशे कोटींचा टप्पा पार करण्यात या विभागाला यश आले आहे.

”आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. मात्र, अद्यापही मोठे लक्ष गाठणे बाकी आहे. करदात्या नागरिकांनी हे लक्ष गाठण्यासाठी कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. महापालिका आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, लोकाभिमुख करणे आणि हे करत असताना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवणे हे आमचे लक्ष्य” असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.