दिल्ली महापालिका निकाल, भाजपसाठी धोक्याची घंटा – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
294

रस्ते, पाणी, शाळा, हॉस्पिटल, कचरा आणि भ्रष्टाचार निर्मुलन या मुद्यांवर आम आदमी पार्टी अर्थात `आप` ने दिल्ली महापालिकेची निवडणूक जिंकली. आजवर दिल्लीतील ही चौथी निवडणूक आहे जी आप ने सकारात्मक राजकारणातून जिंकली. सलग १५ वर्षे सत्तेत राहुन मस्तवाल झालेल्या भाजपच्या सत्तेलाच आपने सुरुंग लावला. आठ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री, १०० वर खासदार-आमदार आणि सगळी सरकारी यंत्रणा हाताशी असतानाही मोदी-शाहांची भाजप देशाच्या राजधानीत पराभूत झाली. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स, पोलिस असे सगळे तंत्र-मंत्र वापरुनही विरोधकांना नामोहरण करता आले नाही. कदाचित जनतेलाच ते आवडलेले नाही. सत्तेसाठी विरोधातील दुसऱ्या बलवान पक्षांत फूट पाडायची त्यांचे उमेदवार आणि नेते खरेदी करायचे आणि पूर्वी काँग्रेसने केले तसेच गलिच्छ राजकारण करायचे, हे भाजपचे राजकारणसुध्दा जनतेने नाकारले आहे. दिल्ली महापालिका निकालाचा हा संदेश आहे. महाराष्ट्रातून शिवसेना संपवायची आणि मुंबई महापालिका मिळवायची अशा तोऱ्यात सुसाट निघालेल्या भाजपच्या पायाखालची सतरंजी दिल्लीकरांनीच काढून घेतली. दिल्ली, पंजाब राज्यांत सत्ता स्थापन करुन पुढे गोवा, गुजराथ मध्ये लोकांच्या पसंतीला उतरलेली आप आणि केजरीवाल हे प्रकरण आता भाजपसाठी वाटते तितके सोपे राहिलेले नाही. नव्हे ती धोक्याची घंटा आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर सामान्य जनतेची मोदीं इतकीच अढळ श्रध्दा आहे, लोकांचा त्यांच्यावरही गाढ विश्वास आहे. उद्या मोदींच्या गुजराथ राज्यात भाजपच सत्तेत येणार यात वाद नाही, पण तिथे आप सारख्या छोट्या पक्षाने १०-२० जागा घेतल्या तरी भाजपसाठी ती एक चपराक असेल.

दिल्ली महापालिकेत सलग १५ वर्षे भाजपची सत्ता होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकित २५० पैकी १६३ जागांवर भाजप आणि जेमतेम ५१ जागांवर आप, तर ३५ जागांवर आप असे संख्याबळ होते. आताच्या निकालात १३५ जागांवर आपने बाजी मारली आणि भाजपला १०५ जागावंर थोपवून ठेवले. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. हे आकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बलाढ्य पक्षांसाठी बरेच काही सांगून जातात. मोदींचा करिश्मा देशात ठिक आहे पण आता दिल्लीत चालत नाही, असा मतदारांचा सांगावा आहे. जिथे हातातली दिल्ली महापालिका जाऊ शकते तिथे आता मुंबई महापालिका हिरावून घेण्याच्या गप्पा भाजपने मारु नयेत. सर्व सत्ता, प्रशासकीय यंत्रणा, पैसा हातात असतानाही भाजपचा पराभव करणे शक्य आहे, हे निकालाने दाखवून दिले. उठसूठ हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशिद किंवा दहशतवादाचा भावनिक मुद्दा प्रचारात आणायचा, मतांचे ध्रुवीकरण करायचे आणि लोकांना भिती दाखवून स्वतःची पोळी भाजून घ्यायची ही भाजपची क्लुप्ती आता लोकांना लक्षात आली आहे. केजरीवाल यांनी पाणी, वीज मोफत देण्याची फक्त घोषणा केली नाही तर दिल्ली आणि पंजाब राज्यात ती प्रत्यक्षात आणून दाखवली. महापालिकेची शाळासुध्दा आदर्श असू शकते, गोरगरीबांची मुले त्याच शाळांतून आयएएस, आयपीएस होऊ शकतात किंवा आयआयटी तून अभियंता बनू शकतात, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. दिल्लीत हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजारावरही दर्जेदार उपचार मिळतात. गरीबांना आजारापणात मोफत उपचार मिळतात म्हणून कष्टकरी आप च्या मागे आहेत.

केवळ विकासाचेच मुद्दे घेऊन मते मिळू शकतात आणि निवडणुक जिंकता येते हा आत्मविश्वास केजरीवाल यांनी तमाम राजकारण्यांना दिला. याच मुद्यांवर सर्वांनीच आणि विशेषतः दिल्लीतील १२ टक्के मुस्लिम मतदारांनीसुध्दा काँग्रेसला सोडून यावेळी आप ला भरभरून मते दिली. ५० प्रभागांतून मुस्लिम मतदार आप च्या मागे गेल्याने ही मजल मारणे आप ला सहज शक्य झाले. भाजपने यातून शहाणपण शिकले पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मिर अशी भारतजोडो यात्रा काढली पण अजूनही सामान्य मतदार त्यांच्याकडे मोदींना पर्याय म्हणून पहायला तयार नाही. एकूणच काय तर आगामी काळात केजरीवाल हे देशाच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलू शकतात. गोरगरीब, मध्यवर्गाला तेच पाहिजे. भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊ देणार नाही, अशी फक्त घोषणा करून चालत नाही तर ते करुन दाखवावे लागते. मोदींच्या घोषणा फार झाल्या पण भ्रष्टाचार तसूभरही कमी व्हायला तयार नाही. त्या तुलनेत केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराला बऱ्यापैकी आळा घालून दाखवला म्हणून लोक खूश आहेत. पंजाब राज्यात मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी सत्तेत येताच ७५ लाख पैकी ६१ लाख लोकांचे वीज बील माफ केले. दिल्ली गेली, पंजाब गेले आता मोठमोठ्या महापालिकांतूनही आप चा झाडू फिरतोय. योगागुरु रामदेवबाबा आता म्हणतात, हे केजरीवाल प्रकरण सहज सहज घेऊ नका. मोदी-शाह यांच्यासाठी केजरीवाल हा सर्वात मोठा खोडा असणार आहे, कदाचित तो पर्याय असू शकतो.