सीमा प्रश्नावर लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या !

0
288

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमेवरील काही गावांवर दावा सांगण्यावरून सुरू असलेला वाद पुन्हा चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातल्या ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याचं समोर आल्यानंतर हा वाद वाढला. सोमवारी सीमाभागात काही मराठी भाषिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटलेले पाहायला मिळाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांसोबतच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरही चर्चा पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रश्नावरून संसदेत खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला. यासंदर्भात भूमिका मांडताना त्यांनी अमित शाह यांनाही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

“महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर त्याला महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनीही दुजोरा देत टीका करायला सुरुवात केली. कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, असं म्हणत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

एकीकडे सुप्रिया सुळे आणि इतर खासदार आक्रमक होत असताना दुसरीकडे कर्नाटकमधील हवेरी मतदारसंघाचे भाजपा खासदार शिवकुमार उदासी यांनी यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारे वर्तन करतात. त्यांना लिंगो कल्चरल सिंड्रोम झालाय. जेव्हा ते सत्तेतून पायउतार होतात, तेव्हा हे अशा प्रकारे वर्तन करतात”, अशा शब्दांत त्यांनी सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांना प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसंच, सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत “दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार? ही संसद आहे. हे अजिबात चालणार नाही”, असं ते म्हणाले.