एरोमॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकामुळे बालपण झालेे जागृत

0
222

पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांचे भावूक उद्गारः योजक तर्फे एरोमॉडेलिंग शो मध्ये ३ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

पिंपरी, दि.(पीसीबी) :“ विमानांचे आकर्षण काय असते हे गडचिरोली येथे पाहण्यात आले. येथील माडिया जमातीतील विद्यार्थ्यांना भारत दर्शनासाठी नेले होते. परंतू त्यांना विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये बसणे हे भारत दर्शनापेक्षा अधिक महत्वाचे वाटले. त्यांचा चेहर्‍यावरील आनंदाने सर्वांचे बालपण जागृत केले. आज ही एरोमॉडेलिंगचे प्रात्यक्षिके पाहतांना बालपण जागृत झाले.” असे भावूक उद्गार पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांनी व्यक्त केले.

यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड नॉलेज (योजक) आणि बजाज ऑटो सीएसआरच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील एच.ए. मैदानावर आयोजित ‘एरोमॉडेलिंग शो’ च्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी बजाज सीएसआरच्या वरिष्ठ मॅनेजर भुपाली म्हस्कर या होत्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त अण्णासाहेब बोधडे, उपायुक्त संदीप खोत, फोर्ब्स मार्शलच्या सीएसआर प्रमुख बिना जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच योजकचे संस्थापक अतुल इनामदार, संचालिका रेणू इनामदार,पीसीएमसीचे आयटी व सीएसआर प्रमुख निलकंठ पोमण, दत्ता पवार, माजिद खान, रेश्मा आंधळे व विजय वावरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांचे नवीन पंख देण्यासाठी आयोजित या शो मध्ये विमान मॉडेल्सच्या उड्डाणाचे रोमांचक प्रात्यक्षिक होते. यावेळी पीसीएमचे ३ हजार विद्यार्थ्यांनी शोचा आनंद लुटला.शेखर सिंग म्हणाले,“ मनपातर्फे एज्यूकेशनल कार्निवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी याचा शेवट एरोमॉडेलिंग शो च्या द्वारे करण्यात येईल. तंत्रशिक्षणाचा ध्यास,करी जीवन विकास हा देण्यात आलेला संदेश विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप मोठा आहे.”

अतुल इनामदार म्हणाले,“ एरोमॉडेलिंग शो हा कल्पनांना भरारी देणारा आहे. संस्थेच्या माध्यमातून पीसीएमसी भागातील वस्त्यामधील लर्नींग सेंटरमध्ये मुलांना तांत्रिक उपकरणे हाताळता येणार आहेत. शासन, सीएसआर व झपाटलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने आमचे कार्य सुरू आहे. आज संस्थेमध्ये १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते काम करीत आहेत.”

भुपाली म्हस्कर म्हणाल्या,“ विद्यार्थ्यांना विमानांचे आकर्षण आहे. शोच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांच्या कल्पनांना आकार देणे, त्यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील रूची वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बजाजतर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.”
रेणू इनामदार म्हणाल्या, “योजक स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील आदिवासी आणि झोपडपट्टीतील असुरक्षित समुदायांना शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञानाबद्दल सक्षम बनविण्याचे कार्य करीत आहे. आज पीसीएमसी व बजाजच्या सीएसआरतर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीने १२ वस्ती पातळीवरील लर्नींग सेंटरमध्ये ८वी ते १०वी च्या १५०० विद्यार्थ्यांना रोज २ तास विज्ञान व गणिताचे शिक्षण दिले जाते. तसेच आठड्यातून एकदा तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत.”
बिना जोशी म्हणाल्या,“योजकने सुरू केलेल्या प्रकल्पाने उंच भरारी घेतली आहेच पण त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्यांना

टक्कर देण्याची प्रेरणा जागृत केली आहे. येथील शो पाहून आज खर्‍या अर्थाने बाल दिवस साजरा करीत आहोत.”
यावेळी विद्यार्थी निलेश पांडे यांनी ही आपली भावना व्यक्त केली.
स्मिता रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.