…म्हणून तुकाराम मुंढे यांची झाली तत्काळ बदली

0
547

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी शिस्त घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि राज्यभरात ‘कोव्हीड’ उपाय योजनाच्या निधीतून खरेदीच्या नावाखाली उधळपट्टी करण्याच्या प्रकारची चौकशी लावणाऱ्या आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे यांची दोनच महिन्यात बदली झाली.

तुकाराम मुंडे यांना डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. खात्यांतर्गत राजकीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल रोष टोकाला गेल्याने त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले मुंढे जिल्ह्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी आहेत. शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे. त्यांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे प्रशासन ताळावर येते आणि संबंधीत खात्याचा लाभ तळागळापर्यंत पोचतो.

मुंढे स्थानिक सत्ताधाऱ्यांपासून खात्यालाही ते नकोसे होतात असा पुर्वानुभव आहे. त्याचाच प्रत्यय आरोग्य विभागात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या महायुती सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम केल्याने त्यांना या खात्याबद्दल अधिक कनवळा आहे. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोचविल या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केल्याची माहिती आहे.

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी कारभारासाठी प्रसिध्द असलेले मुंढे हे जिथे जातील तिथे त्यांची कार्यपध्दती लागू करतात. नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना गेली २५-३० वर्षे मिळकतकर न भरलेल्या मिळकती शोधून शेकडो कोटींचा महसूल वाढविला. पीएमपीएमएल मध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला म्हणून राजकारणी नाराज होते. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते काम करत असल्याने राजकीय मंडळी नाराज आहेत. त्यातूनच त्यांचे बदल्यांचे रेकॉर्ड झाले आहे.