अभिनेत्री रिचा चड्ढाकडून लष्कराबाबत वादग्रस्त ट्विट, म्हणाली…

0
254

देश,दि.११(पीसीबी) – अभिनेत्री रिचा चढ्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलत असते. तिच्या या प्रतिक्रिया देण्यामुळे कधी तिची प्रशंसा होते तर कधी रिचाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतेच रिचा चढ्ढा हिने लष्कराबाबत एक ट्विट केले असून, तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.

2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले. यामुळे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त केली आहे. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट करून लिहिले की, ‘गॅलवनमध्ये 20 शूर जवानांनी देशासाठी प्राण दिले पण इथे एक अभिनेत्री भारतीय लष्कराची खिल्ली उडवत आहे’.