आयुक्त शेखर सिंह आजपासून रजेवर; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे पदभार

0
273

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे आज (बुधवार) पासून चार दिवस म्हणजे शनिवार (दि.26) पर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार तात्पुरता स्वरूपात अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) आयुक्त सिंह बैठकीसाठी मुंबईत होते.

महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 12 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर राज्य शासनाने महापालिका आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय राजवट सुरू असल्याने आयुक्तांवर मोठी जबाबदारी आहे. आयुक्त सिंह हे उद्यापासून शनिवार (दि.26) पर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देणे गरजेचे होते. त्यानुसार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे आयुक्तांचा तात्पुरता पदभार प्रशासनाने सोपविला आहे.

दरम्यान, प्रशासकीय राजवट असली तरी स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर आठवड्यात मंगळवारी होते. याचवेळी सर्वसाधारण सभाही घेतली जाते. पण, मंगळवारी आयुक्त मुंबईला गेले होते. त्यामुळे आज होणारी स्थायी समिती, सर्वसाधारण सभा झाली नाही.
आता स्थायी समितीची बैठक पुढील आठवड्यातच होण्याची शक्‍यता आहे.