शहराचे आमदार-खासदार करतात काय ? तिसरा अतिरिक्त आयुक्त शासनाचाच

0
465

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनात एक एक करत राज्य सरकारची अधिकाऱ्यांची शिरजोरी वाढली आहे. मलाईदार पोस्टसाठी या अधिकाऱ्यांची चढाओढ चालते आणि त्या स्पर्धेत महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना पध्दतशीर बाहेर काढले जाते. या विषयावर शहरातील आमदार-खासदार निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. आकृतीबंधानुसार दोन शासनाचे आणि एक महापालिकेतील अधिकारी अतिरिक्त आयुक्तपदावर असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात पालिकेतील अधिकारी निकश पूर्ण करत नसल्याचे कारण देत तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर सुनील थोरवे यांची नियुक्ती करण्यात आल्याने महापालिका कर्मचारी महासंघाने आता दोन हात करायचा निर्णय केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांपैकी अतिरिक्त आयुक्त पदावरील उल्हास जगताप हे मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय केला जातो आहे, अशीही भावना आहे.

राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्तांमध्ये प्रदिप जांभळे पाटील आणि जितेंद्र वाघ यांची यापूर्वीच नियुक्त करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची नियुक्ती केल्याने स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या तिसऱ्या जागेवर प्रभारी असलेले उल्हास जगताप यांना त्यांची खुर्ची सोडावी लागणार आहे. महापालिकेतील एकही अधिकारी या पदासाठीचे निकश पूर्ण करत नसल्याचे कारण महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शासनाला कळविले आणि त्यानंतर थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली. थोरवे हे शेखर सिंह यांच्या बरोबर सातार येथे तीन वर्षे होते. महापालिकेत थोरवे यांचीच नियुक्ती व्हावी यासाठी स्वतः सिंह सातत्याने पाठपुरावा करत होते, असेही समोर आल्याने आता ही नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
महापालिकेत शासनाचे दोन अतिरिक्त आयुक्त हे `आयएएस` असावेत असे सुरवातीपासून ठरलेले असताना त्याबाबत सिंह बोलायला तयार नाहीत. पुणे महापालिकेत दोन्ही अतिरिक्त आयुक्त थेट आयएएस आहेत, मात्र पिंपरी चिंचवडला त्या दर्जाचे अधिकारी मिळत नाहीत. शहराचे आमदार-खासदार त्याबाबत लक्ष द्यायला तयार नाहीत म्हणुन कर्मचारी नाराज आहेत.

महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांप्रमाणेच अन्य बहुतांश पदांवर शासनाकडून नियुक्त्या होऊ लागल्याने स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. लेखापरिक्षण आणि लेखा अधिकारी विभागाचे प्रमुख अधिकारी हे महापालिकेतील असतं, आता तिथे शासकिय सेवेतून आलेले जितेंद्र कोळंबे आणि प्रमोद भोसले यांची नियुक्ती आहे. शिक्षण अधिकारी सुध्दा महापालिकेतील असतं आता तिथे शासनाकडील संजय नाईकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचा सर्व पदभार महापालिकेचे निळकंठ पोमण यांच्याकडे होता आता त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाकडील किरणराज यादव यांच्याकडे सुपूर्द कऱण्यात आली आहे. मुख्य शहर अभियंता पदावर महापालिकेतील मकरंद निकम आहेत. या पदासाठी शासकीय सेवेतून आलेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले अशोक भालके यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती.