महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना; चार सदस्यांचा प्रभाग राहणार

0
398

पिंपरी,दी.23 (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्याची सांगितल्याने निवडणूक तीनसदस्यीय नव्हे तर चारसदस्यीय पद्धतीनेच होणार असून नगरसेवकसंख्या 128 च राहणार आहे.

याबाबत नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (मंगळवारी) आदेश महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मध्ये संदर्भिय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेच प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी.

राज्य शासनाने तीनसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. नगरसेवकांची संख्या 128 वरुन 139 वर नेली होती. तीनसदस्यीय पद्धतीनुसार 46 प्रभाग असणार होते. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी होती. सर्वसाधारण वर्गासाठी 77, ओबीसीसाठी 37, अनुसूचित जमाती (एसटी)साठी 3 तर अनुसूचित जाती (एससी)साठी 22 जागा राखीव होत्या.

राज्य शासनाने वाढीव 11 नगरसेवकसंख्या रद्द केली आहे. त्यामुळे 2017 पूर्वीप्रमाणेच चारसदस्यीय पद्धतीने निवडणूक होईल. 2017 चीच प्रभाग रचना राहू शकते.
नगर विकास विभागाने मंगळवारी (22) याबाबतचा आदेश महापालिका आयुक्तांना पाठविला आहे.

महापालिका निवडणूक विभागाकडून जवळपास 1 वर्षे निवडणुकीची तयारी सुरु होती. सुरुवातील एकसदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली. त्यात पुन्हा शासनाने बदल केला. त्यानंतर तीनसदस्यीय पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया केली. प्रारुप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना झाली. मतदार याद्या अंतिम झाल्या होत्या. दोनवेळा आरक्षण सोडत काढली. ओबीसींसह काढलेले प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 5 ऑगस्ट 2022 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार होते. असे असताना आता राज्य सरकारने अचानक वाढवलेली 11 ची नगरसेवक संख्या रद्द केली.

त्यामुळे नवीन प्रभाग रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली प्रभाग संख्या ठरली होती. त्या प्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने केलेल्या कामावर पाणी फेरले आहे. पैसाही वाया गेला आहे. 2017 मध्ये चारसदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. आता त्यानुसारच निवडणूक होईल. नगरसेवकसंख्या 128 च राहणार आहे. चारसदस्यीय पद्धतीने 32 प्रभाग राहतील. अनुसूचित जातींसाठी 20 तर एसटीसाठी 3 जागा राखीव राहतील.

भाजपमध्ये आनंद तर राष्ट्रवादीत नाराजी

तीनसदस्यीय प्रभाग रचना महाविकास आघाडी सरकार असताना झाली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कलानुसार आणि राष्ट्रवादीच्या सोईनुसार प्रभार रचना केल्याचे आरोप झाले होते. तीनसदस्यीय पद्धतीने झालेली प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल आहे, असे सांगितले जात होते. तीनसदस्यीय प्रभाग पद्धत भाजपसाठी कठिण होते. दरम्यान, शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सरकार येताच भाजपकडून प्रभार रचना रद्द करण्याची मागणी केली जात होती. राज्य शासनाने वाढलेली 11 ची नगरसेवकसंख्या रद्द केली. त्यामुळे भाजपमध्ये आनंद आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला आहे.