मी नाराज नाही, परदेशात होतो…

0
278

मावळ,दि.११(पीसीबी) – मी नाराज होऊन अलिप्त झालो नव्हतो असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच माझा परदेशी दौरा ठरला होता, त्यानुसार मी परदेशी गेलो होतो, असे ते म्हणाले. मावळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या नाराजीवरून रंगलेल्या नाट्यावर त्यांनी पुन्हा नाराजीच व्यक्त केली.

४ नोव्हेंबरपासून अजित पवार नॉट रिचेबल होते. ते त्यांच्या आजोळी गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ते त्यांच्या आजोळ असलेल्या देवळाली प्रवरालाही पोहोचले नसल्याची माहिती काल मिळाली. त्यामुळे अजित पवार नेमके गेले कुठे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात शरद पवारांनी मार्गदर्शन केलं पण अजित पवार तेथे अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत मंथन शिबिर झाल्यानंतर नेते अजित पवार नॉट रिचेबल होते.

दरम्यान, आठ दिवसा नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे दर्शन झाले. मावळ येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावून त्यांनी भाषण केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाच – सहा वर्षांपासून परदेशात जाण्याची संधी मिळाली नाही. संधी अनेकदा आली पण कामामुळे मला जाता आलं नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरला रात्री उशीरा मी फ्लाईटने परदेशी गेलो. आणि १० तारखेला रात्री उशीराने आलो. सहा महिन्यांपूर्वीच हा दौरा ठरलेला होता. पण इथे माझ्या मागे मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. दादा वाचून यांचं काय अडतं काय माहित? दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही? पुढे वारेमाप प्रचार केला. कारण नसताना माझी बदनामी करायची, कारण नसताना गैरसमज निर्माण करायची. सहा महिन्यांपूर्वीच तिकिटे काढली होती. म्हणून परदेशात गेलो होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. अजित पवार कुठे गेले याची माहिती मिळवण्याकरता माझ्या कार्यालयाशी संपर्क साधायचा होता. माझी उगाच बदनामी केली गेली, असंही अजित पवार म्हणाले. मला मध्यंतरी खोकला होता. मी आजारी होतो. पण नंतर मी सहा महिन्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे दौऱ्याला गेलो. पण इथे काहीही बातम्या दिल्या गेल्या.