मुंबई,दि.०५(पीसीबी) – शिवसेनेतील बंडानंतर आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अगोदर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज(६ नोव्हेंबर) निकाल लागणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
या निवडणुकीत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात सुरुवातीला भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु नंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपाने आपला उमेदवार या निवडणुकीतून मागे घेतला. त्यामुळे या मतदार संघासाठी ऋतुजा लटके यांच्याविरोधात कोणताही प्रबळ उमदेवार न उरल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र तरीही या जागेसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यामध्ये ऋतुजा लटके यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवारांचा समावेश होता.
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आज (रविवार) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. ज्यामध्ये, ऋतुजा रमेश लटके (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी-पीपल्स), मिलिंद कांबळे(अपक्ष), नीना खेडेकर (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद(अपक्ष) या उमेदवारांचा समावेश होता.