मुंबई,दि.०५(पीसीबी) – राज्यात तीन महिन्यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी शिवसेना पक्षाला संपवत असल्याचा आरोप करत शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात बंडखोरी केली होती. त्यानंतर शिंदे गटाने भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यात आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
“२०१९ साली राष्ट्रवादीने भाजपाबरोबर शपथ घेतली होती. कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते, तशीच ती सकाळ होती. शिंदे गटाने हा उठाव केला नसता, तर राष्ट्रवादीने भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली असती,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
शिर्डीतील राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन झाल्यावर सरकार कोसळेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आमदार फुटू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशी विधाने केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,” असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
“आम्ही भाजपात प्रवेश केला का?”
वाढलेल्या घरात गद्दारी करणे चुकीचं आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर “आम्ही पक्ष कुठे सोडला आहे? मूळ शिवसेना आम्हीच आहोत. आम्ही भाजपात प्रवेश केला का? बाळासाहेबांची शिवसेना आम्ही आहोत,” असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. .