पिंपरी, दि.४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 6 वर्षाच्या मुलावर स्वरयंत्राची अत्यंत जोखमीची शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.हिंजवडी येथे राहणाऱ्या मयंक भोसले या 6 वर्षाच्या मुलाला श्वास घेण्यास अचानक त्रास झाल्याने त्याला 19 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाला श्वास घेण्यास अत्याधिक त्रास होत असल्या कारणाने त्याला तात्काळ बालरोग अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याच्यावर तातडीचे उपचार करून मुलाची प्रकृती स्थिर करण्यात आली.
बालकाच्या स्वरयंत्रास सूज असल्याकारणाने मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे असे तपासणी दरम्यान आढळून आल्याने बालरोग विभागातील डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सूर्यकांत मुन्डलोड आणि डॉ. अमित राठोड यांच्या पथकाने त्याच्यावर त्वरित उपचार सुरु केले. बालरोग तज्ञांनी तात्काळ कान नाक घसा तज्ञ डॉ. अनिकेत लाठी व डॉ. आदित्य येवलेकर यांचा या संदर्भात सल्ला घेण्याचे ठरवले. इएनटी तज्ञांनी दुर्बिणीद्वारे स्वर यंत्राची तपासणी केली. त्यात द्राक्षासमान गाठ असल्याचे आढळून आले. त्या गाठीचा नमुना काढून रोगनिदानशास्र्त्र प्रयोगशाळा विभागात डॉ. तुषार पाटील यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान मुलाची तब्येत अधिकच खालावली. त्याच्या फुफ्फुसाच्या बाहेरच्या भागात हवा साठून राहिल्याने (Pneumothorax) त्यासाठी उरोरोग तज्ञ डॉ. दिपाली गायकवाड यांचा सल्ला घेण्यात आला. ही गाठ छोटी असली तरी त्यामुळे श्वास घेते वेळेस स्वरयंत्र पूर्णपणे बंद होत होते. या गाठीचा तपासणी अहवाल Laryngeal Papillomatosis असा आला. हा आजार अत्यंत दुर्मिळ असून बालकांमध्ये याचे प्रमाण 1 लाखामागे 2 असे आहे. अशा प्रकारची कुठलीही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे अत्यंत जोखमीचे असते. परंतु मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या पालकांच्या संमतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया इएनटी सर्जन व भूल रोग तज्ञांनी यशस्वी रित्या पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या स्वरयंत्राच्या जखमा बऱ्या होईपर्यंत त्याला बालरोग अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शस्रक्रिया झाल्यानंतर बालरोग अतिदक्षता विभागातील वरिष्ठ व रहिवासी डॉक्टर डॉ. विनीत राठोड, डॉ. महेंद्र, डॉ. मेहरीन, डॉ. गौथम आणि अनुभवी परिचारिका यांनी केलेल्या औषधोपचारामुळे आणि व्यवस्थित घेतलेल्या काळजीमुळे मुलाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. हा मुलगा पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आपला मुलगा ठीक झाल्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर झळकला. या आजाराचा वारंवार त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी किंवा अशा प्रकारचा त्रास उद्भवल्यास काय करावे याबद्दल सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपाली अंबिके यांनी दिली.