उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाची अदलाबदल

0
433

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपआयुक्त आणि सहायक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल करण्यात आला. त्यांच्याकडे आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे नव्याने कार्यभार सोपविले आहेत. त्यानुसार प्रशासन विभागाची जबाबदारी उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे देण्यात आली.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे यापूर्वी दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह), माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र आणि क्रीडा या विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उपआयुक्त जोशी हे सर्व विभागांकरीता समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यांची आस्थापना सामान्य प्रशासन विभागात असणार आहे.

तसेच सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे यापूर्वी निवडणूक व जनगणना (आधार कार्ड योजना) आणि प्रशासन विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. आता त्यांच्याकडे क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र (आधार कार्ड योजना), निवडणूक व जनगणना या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना क्रीडा विभागात राहील. याबाबत स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.