“तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली” संभाजी भिंडेवर सुप्रिया सुळेंची टीका

0
438

मुंबई,दि.०३(पीसीबी) – शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराने कुंकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं विधान त्यांनी केलं असून यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर टीका केली असून, फेसबुकला हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं.

सुप्रिया सुळेंनी शेअर केली कविता –
तू आणि मी ….?
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!
हेरंब कुलकर्णी