४० आमदारांना बाद करण्यासाठी ठाकरेंची तयारी; शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य

0
301

मुंबई,दि.०२(पीसीबी) – ज्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी त्यांना राजकारणातून बाद करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. तशा बातम्या वाचायला मिळत आहेत, असा गौप्यस्फोट करतानाच या कामासाठी माझ्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एक चांगलं काम हाती घेतलं आहे, असा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

माझा प्रश्न फक्त साधा होता. तुम्ही मुख्यमंत्री होता. अडीच वर्ष तुम्ही पदावर होता. तुम्ही या 40 आमदारांच्या मतदारसंघात किती निधी दिला आणि याच आमदारांच्या मतदारसंघात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना किती निधी दिला. हे जरा तपासा, असं आव्हानच रामदास कदम यांनी दिलं.

तुमच्याकडे जे दहा बारा आमदार आहेत. ते कसे निवडून येतात त्याची काळजी घ्या. मी एकनाथ शिंदे यांचं काम मी पाहत आहे. ते विकासासाठी 40 आमदारांच्या मतदारसंघात खोके देत आहेत. विकासकामांसाठी. मतदारसंघाचा विकास झाला तर जनता त्यांच्या पाठी उभे राहील हा माझा विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला.

40 आमदारांना गाडणार असं काही एैरेगैरे सांगत आहे. अरे त्या 40 आमदारांना गाडण्याची भाषा नको. आधी तुम्ही कसे निवडून याल ते पाहा. तुम्ही आता अडचणीत आहात. तुम्ही लोकसभेत जाणार की नाही किंवा विधानसभेत जाणार की नाही ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.

गुवाहाटीतून कसे येतात ते मी बघतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते आले. वरळी या माझ्या मतदारसंघात कसे येतात ते मी बघतो असं आदित्य म्हणाले. ते गेले. विधीमंडळात पाय कसे ठेवतात ते बघतो. पाय पण ठेवले. सर्व झालं, अशा शब्दात त्यांनी आदित्या ठकारे यांची खिल्ली उडवली.

आतापर्यंत ठाकरे आडनावाची माणसं जे बोलत होते. ते करत होते. त्या ओघातच याला गाडणार, त्याला गाडणार हे सुरू आहे. यातच तुम्ही जाणार आहात, असा चिमटा त्यांनी काढला.