पिंपरी,दि.०२(पीसीबी) – स्वच्छ भारत अभियान नागरी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गतचे सर्व नियम पूर्ण करत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत सात तारांकीत नामांकन (7 स्टार रँकींग) कचरा मुक्त शहर, ओडीएफ प्लस-प्लस, वॉटर प्लस शहर म्हणून मान्यता मिळाली. नागरिकांकडून 15 दिवसात हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर मानांकनासाठी शासनाने दिलेली स्वयंघोषणा महापालिका करणार आहे.
राज्यात 15 मे 2015 पासून मिशन मोड पद्धतीने अभियान सुरु करण्यात आले. या अभियानाअंतर्गत सर्व शहरे हागणदारीमुक्त, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे याचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची अंमलबजावणी करत आहे. त्यासाठी हागणदारी मुक्त शहराचे पुढील उद्दीष्ट ओडीएफ प्लसप्लस, वॉटर प्लस व कचरामुक्त शहराचे स्टार रेटिंग जाहीर केले. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत ओडीएफ प्लसप्लस, वॉटर प्लस व कचरामुक्त शहरांच्या सात तारांकीत नामांकन कचरा मुक्त शहर (गारबेज फ्री सिटी) यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमावली, मार्गदर्शक सूचना, कार्यपद्धतीनुसार उपाययोजना केल्या जात आहे.
शहरातील घरोघरी कचरा संकलन करणे, घरोघरी कच-याचे वर्गीकरण करणे, वाहतूक करणे, प्लास्टिक बंदी कार्यवाही, मेकॅनिकल कंपोस्ट प्लँट, बायोगॅस प्लँट, प्लास्टीक टू फ्युअल प्लँटची व्यवस्था केली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ व सुस्थितीत आहेत. सांडपाणी भुयारी गटारे यांची व्यवस्था आहे. ड्रेनेज लाईन सुस्थितीत असून देखभाल करण्यात येते. सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी प्लॅट उभारण्यात आले आहेत. घरे, व्यावसायिक आस्थापना, ड्रेनेज, नाले इत्यादींमधून सोडले जाणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया करुन किमान 25 टक्के पाण्याचा पुर्नवापर केले जातो. बांधकाम, फलोत्पादन, उद्यान, रस्ते साफसफाईकरिता हे पाणी वापरले जाते.