बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे…प्रकाश आंबेडकर म्हणतात…

0
208

मुंबई,दि.०२(पीसीबी) – भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील खोक्यावरून सुरू झालेला वाद मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने दोन्ही नेत्यांनी दोन पावलं मागे घेत हा वाद संपल्याचं जाहीर केलं. मात्र, हा वाद संपला असला तरी या वादाची पडलेली ठिणगी अजूनही धुमसताना दिसत आहे. आता या वादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढंच नव्हेतर आंबेडकर यांनी या वादातील बिटवीन द लाईन एका वाक्यातच सांगितली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. आठ ते दहा दिवस ते विदर्भात असणार आहेत. विदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे आणि छोट्या सभांना ते हजेरी लावणार आहेत. तसेच संघटनात्मक बाबींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे खोका तसाच राहिला फक्त आरोपावरती पडदा पडला, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेसोबत आघाडी करणार आहात का? असा सवाल केला असता आंबेडकर यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान, आंबेडकर हे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना आमच्यातील वाद संपल्याचं जाहीर केलं. तसेच यापुढे कुणीही एकमेकांवर आगपाखड करणार नसल्याचं जाहीर केलं.

त्यानंतर बच्चू कडू यांनी काल अमरावतीत जाहीर मेळावा घेऊन वाद संपल्याचं जाहीर केलं. पण आपल्या भाषणात ते रवी राणा यांना इशाराही देण्यास विसरले नाही. आम्हाला त्रास दिला तर आम्हीही मागे पुढे पाहणार नाही. पण आम्ही कुणाच्या वाट्याला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.