अमरावती,दि.०१(पीसीबी) – आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यात ‘खोक्यां’वरून वाद रंगला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांची माफी मागितली होती. तर, बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज ( १ नोव्हेंबर ) ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांची अमरावतीत बैठक पार पडली. यात बच्चू कडू यांनी रवी राणांना माफ केल्याचं जाहीर केलं.
“कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे आम्ही सोप्पं नाही. पहिली वेळ असल्याने माफ करतो. पण, यानंतर कोणीही आमच्याविरुद्ध बोललं, तर ‘प्रहार’चा वार दाखवू. आम्ही गांधीजींना मानतो, मात्र भगतसिंह डोक्यात आहे,” असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“रवी राणांनी दिलगीरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण, रवी राणांनी मोठेपणा घेत चूक लक्षात आली आणि माफी मागितली, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले, आम्ही चार पावले माघे घेऊ. विनाकारण आम्हाला उर्जा संपवायची नाही आहे,” असेही बच्चू कडू यांनी सांगितलं.