पिंपरी, दि.०१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण विनामूल्य तसेच बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. नोंदणी व सर्वेक्षण सुलभ पद्धतीने होण्यासाठी शहरातील संबंधित फेरीवाल्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधारकार्ड लिंक (संलग्न) करून या सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शासनाने विकसित केलेल्या हॉकर्स अॅपच्या माध्यमातून बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ऑनलाईन असल्यामुळे सर्वेक्षणावेळी मोबाईल संबधित फेरीवाल्यांच्या क्रमांकावर आलेला ओटीपी महत्वाचा असून तो महापालिकेच्या सर्वेक्षण प्रगणकास हे सर्वेक्षण करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आजपासून हे सर्वेक्षण सुरु झाले असून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरु राहील. सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित असणे अनिवार्य आहे. जातप्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ असावी. दिव्यांग, घटस्फोटीता, परितक्ता महिलांसाठी अनुषंगिक पुराव्याची प्रत असणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना यापूर्वी पथविक्रेता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे. यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून काही कारवाई झाली असेल तर संबधित दंडाची पावती सोबत असणे आवश्यक आहे. महापालिकेकडील लेटर ऑफ रेकमंडेशनची प्रत किंवा पीएम स्वनिधी कर्ज प्राप्त झाल्याचे कागदपत्र तसेच कोविड 19 च्या कालावधीमध्ये महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना देण्यात आलेला पास आदी कागदपत्रे संबंधित फेरीवाल्यांनी सर्वेक्षणावेळी स्वतःजवळ बाळगणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती फेरीवाल्यांनी सोबत ठेवाव्यात. तसेच आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्र करून घ्यावा. आधार क्रमांक नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली आधार नोंदणी पूर्ण करावी, अशी माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.
शहराच्या इंडेक्समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि फेरीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्यादृष्टीने 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याकामी फेरीवाल्यांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने जोशी यांनी केले आहे.