जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय, याचं वाईट वाटतं – राज ठाकरे

0
324

मुंबई,दि.३१(पीसीबी) – राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. शिवाय पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं जात आहे. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीका-टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आज प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय.”

याशिवाय “मला असं वाटतं पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे, की प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?. मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या लोकांना तिथून आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प जर समजा प्रत्येक राज्यांमध्ये गेले तर देशाचाच विकास होईल.” असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

“आजही महाराष्ट्र राज्य उद्योग-धंद्यांच्याबाबतीत हे इतर कोणत्याही राज्यापेक्षा पुढे आहे. उद्योग-धंद्यांच्याबाबतीत महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहिलेला आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र हेच राज्य त्यांचं प्रथम क्रमांकाचं वाटत आलेलं आहे. त्यामुळे असं नाही की गुजरातमध्ये फार चांगल्या सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात कमी सुविधा आहेत. मला असं वाटतं की या गोष्टीकडे राजकीय न पाहता, देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.” असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी “सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत खालच्या पातळीवरचं आहे. जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, जी भाषा वापरली जात आहे तीही इतक्या खालच्या स्तराची भाषा आहे, की असं राजकारण मी या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं. दुर्दैवं दुसरं काय बोलणार.” असे म्हटले.