पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळीत केली “एवढ्या” कोटींची सोने खरेदी

0
314

पिंपरी,दि.३१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळी सणानिमित्त सोने खरेदीवर भर दिल्याचे दिसून येत असून 50 कोटी रुपयांचे सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. दसऱ्याला देखील सराफा बाजारात सुमारे 40 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

दसऱ्या पाठोपाठ सराफी बाजारात दिवाळीत शहरवासीयांनी जोरदार सोने खरेदी केली आहे. त्यामुळे शहरातील सराफी बाजारपेठेत तब्बल 50 कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर राज्य सरकारने सर्वच सणांवरील निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे दिवाळी सणांला शहर आणि परिसरातील बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मनसोक्त खरेदी केली आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी दिवाळी सणाचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली.

सोन्याचे 24 कॅरेटचे भाव 50 हजार रुपये होते. तर चांदी 55 हजार 555 रूपयांवर आली होती. सोन्याची खरेदी करण्यासाठी सोने-चांदी दुकानात दिवाळीच्या चारही दिवस नागरिकांची मोठी गर्दी होती. अनेक प्रकारचे दागिन्यांची खरेदी करण्यात आली. याशिवाय चांदी, हिरेयुक्त दागिन्यांची खरेदी झाली. शहरात 400 सराफी पेढी आहेत. या सर्व दुकानांमधून 50 कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचे पिंपरी-चिंचवड ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा यांनी सांगितले.