टाटा एअरबसनंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर…!

0
279

नागपूर,दि.३०(पीसीबी) – महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबसनंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने बेरोजगार तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत चार प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. यावरून राज्यातील राजकारणात आकांडतांडव सुरू आहे.

नागपूर येथील एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी हैदराबादला गेली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ११८५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक येणार होती. राज्यात ५०० ते ६०० कुशल रोजगार निर्मिती होणार होती.

प्रकल्प कुणामुळे राज्याबाहेर जात आहे, याबाबत सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत राहतील, पण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, याकडे कुणी लक्ष देणार आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. सरकार कुणाचेही असो पण राज्यातील प्रकल्प बाहेर का जात आहेत, याला राज्यकर्ते का प्रशासन जबाबदार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्यामागे कोण आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

नागपूर येथील महाराष्ट्र विमानतळ कंपनी मिहानमध्ये फ्रेंचची सॅफ्रन ग्रुप येऊ इच्छित होती. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा सुद्धा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्राला हा प्रकल्प गमवावा लागला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला असल्याची चर्चा आहे.

विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे 1,185 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.