शहरातील छठ पूजा उत्सवात पोलीस सुरक्षा पुरवा

0
315

-छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांची पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे मागणी…

पिंपरी,दि.२९ (पीसीबी)- कोरोना कालखंडानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय बांधवांकडून शहरातील सर्व घाटांवर छठ पूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाने योग्य त्या मार्गदर्शक सूचनांसह पोलीस सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात छठपूजा उत्सव गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वर्षानुवर्षे भाविकांची संख्या वाढतच आहे. चिंचवडच्या पवना नदी किनारी, बिर्ला हॉस्पिटल रोड येथील खंडू चिंचवडे घाट (हॉटेल रिव्हर व्ह्यू, गणपती विसर्जन घाट) येथे छठ पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ रविवार (दि. ३०) रोजी दुपारी ३.०० वाजता बडकी छठ पूजेने (संध्या अर्ध) होणार आहे. सोमवार (दि. ३१) रोजी सकाळी १०.०० वा पारण (प्रातः अर्ध) या धार्मिक अनुष्ठानाने छठ पूजा कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या दरम्यान धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी प्रभाग कार्यालयास घाट स्वच्छता आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना कराव्यात. तसेच पोलीस आयुक्त यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन व्हावे, अनुचित घटना टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त द्यावा. त्यामुळे हा धार्मिक कार्यक्रम विनाअडथळा संपन्न होईल, असे या निवेदनात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.