कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी घेणार राज्यव्यापी बैठक

0
152

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कष्टकरी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर , अन्यायकारक नवीन कामगार कायदे तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, वाहन चालक, मालक यांच्यासाठीच्या विविध योजनांसह त्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच मुंबईत राज्यव्यापी बैठक घेण्यात यावी अशी मागणी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. त्याला पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पदाधिका-यांसह मुंबई येथे भेट घेतली. कामगार प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, फरीद शेख, इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणच्या कामगारांना किमान आणि समान वेतन मिळत नाही. कंत्राट दारांकडून त्यांची पिळवणूक होत आहे. त्याचबरोबर नवीन कामगार कायद्याच्या कचाट्यामध्ये कामगार सापडून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर कष्टकरी कामगारांच्या अपघाती मृत्यूबाबत ही यावेळी चर्चा झाली. याबाबत लवकरच माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, पक्षातील पदाधिकारी यांच्यासोबत प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.