…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील – भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

0
292

– राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटणार असल्याची जोरदार चर्चा

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिंदे गटातील आमदार फुटण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. प्रसंगी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असाही गौप्यस्फोट त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

“शिंदे गट आणि भारती जनता पार्टी एकच आहे. आम्हाला हे सरकार चालवायचं आहे, आमचा कार्यकाळ पूर्ण करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सध्या शिंदे गटातील आमदार फुटणार असल्याचा दावा करतात पण त्याअगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचेच आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत, आपल्याजवळील आमदार फुटू नये म्हणून ते अशा अफवा सोडत आहेत” असं दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदार फुटणार असल्याच्या अफवा सोडल्या जात आहेत. तर माजी खासदात चंद्रकांत खैरे यांनी आपल्या संपर्कात बरेच आमदार असल्याचा दावा केला होता. पण अजूनही शिंदे गटाकडून एकही आमदार परत ठाकरे गटाकडे गेला नाही. ठाकरे गटातील नेत्यांच्या दाव्याला रावसाहेब दानवे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.

आपल्या देशात लोकशाही आहे.राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे बहुमत आलं. तर निश्चितपणे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं दानवे म्हणालेत. अजित पवार राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. जितकं झपाटून काम करतात तितकंच रोखठोक बोलतात. काम होणार असेल तर त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवतात. पण जर काम होणार नसेल तर स्पष्ट नकार देतात, ही त्यांची ख्याती आहे. पण मुख्यमंत्रीपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागलंय. ते चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. पण आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.

रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या भविष्यबाबत मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीचा एखादा नेता मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा राहिल, असं रोहित पवार म्हणालेत.