देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघात ४० हजार फराळ डब्यांचे वाटप

0
172

नागपूर, दि. २२ (पीसीबी) : सर्वसामान्यांची दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबीयांना भाजपकडून फराळाचे डबे वाटप केले जात आहेत. यासाठी फराळाचे ४० हजार डबे तयार करण्यात आले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसंपर्क वाढवला आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात दिवाळीनिमित्त झोपडपट्टीतील नागरिकांना फराळाचे डबे भेट म्हणून दिले जात आहेत. या डब्यात चिवडा, शेव, शंकरपाळे आहेत तर सोनपापडीचा डब्बा वेगळा दिला जात आहे. प्रत्येक झोपडपट्टीतील नागरिकांना हा फराळ पोहचावा यासाठी भाजपाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. ४० हजार कुटुंबापर्यंत हे फराळाचे डबे पोहचवले जाणार आहेत.

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करते. पण अनेकदा गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. ते फराळाविना राहू नये या भावनेतून फराळ वाटप केला जात असल्याचे भाजपच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी सांगितले.