पर्यटकांना दिवाळी ‘गिफ्ट’; नेरळ ते माथेरान ‘टॉय ट्रेन’ आजपासून सुरु

0
215

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – अपघाताचे कारण देत बंद केलेली मावळ लोकसभा मतदारसंघातील थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणारी ‘टॉय ट्रेन’ (छोटी रेल्वे) आजपासून पुन्हा सुरु झाली. मागील पाच वर्षांपासून बंद असलेली ‘टॉय ट्रेन’ सुरु करुन खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरानला येणा-या पर्यटकांना दिवाळी ‘गिफ्ट’ दिले आहे. ही ट्रेन सुरु झाल्याने स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचा युनोस्कच्या यादीत समावेश आहे. येथे ‘टॉय ट्रेन’च्या माध्यमातून पर्यटक ये-जा करतात. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे 21 किलो मीटरचे अंतर सुमारे 2 तास 20 मिनिटांमध्ये पार करते. ‘टॉय ट्रेन’ही सेवा पर्यटकांसह स्थानिकांसाठी एक प्रमुख साधन आहे. माथेरानमध्ये हजारो पर्यटक येतात. परंतु, अपघाताचे कारण देत पाच वर्षांपूर्वी ही ‘टॉय ट्रेन’ रेल्वे विभागाने बंद केली होती. त्यामुळे माथेरानला येणा-या पर्यटकांचा हिरमोड होत होता”.

”पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची ‘टॉय ट्रेन’ पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला. मोठ्या प्रमाणात निधी मिळवून रेल्वे ट्रॅक दुरुस्त करुन घेतला. अतिपावसामुळे रुळावरुन ‘टॉय ट्रेन’ धावण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याठिकाणी कॅबीन वॉल उभ्या केल्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे विभागाच्या मदतीने ‘टॉय ट्रेन’चा मार्ग दुरुस्त केला. रेल्वे विभागाने नवीन इंजिन, डब्बे” दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

दिवाळीच्या मुहुर्तावर धावली ‘टॉय ट्रेन’
काम पूर्ण झाल्यानंतर नेरळ ते माथेरान ही ‘टॉय ट्रेन’ सेवा सुरु करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यांनीही मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज दिवाळीच्या मुहुर्तावर नेरळ स्टेशन ते माथेरान ही ‘टॉय ट्रेन’ सुरु झाली. त्यामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. लहान मुलांसह नागरिकांची आकर्षण असलेली ट्रेन सुरु झाल्याने मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानला भेट देतील. दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची माथेरानला गर्दी होते. त्या पर्यटकांना प्रवासाची सोय झाले. ट्रेन सुरु झाल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. व्यावसायाला चालना मिळेल. खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही ‘टॉय ट्रेन’सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.