उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि नेते मिलिंद नार्वेकर भाजपच्या वाटेवर

0
257

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्याच्या राजकारणात रोज फोडाफोडीचे राजकारण सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि नेते मिलिंद नार्वेकर हे नाराज असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनी या चर्चांना जोर देण्याचं काम केलं होतं. अशातच भाजप नेते अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांना नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर आता अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे.

ही चर्चा सुरू असतानाच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलंय. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मी ऐकतोय, असं विधान गिरीश महाजन केलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मिलिंद नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद नार्वेकर यांनी शाह यांना ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी त्यांनी जय शाह यांना बीसीसीआय सेक्रेटरीपदी फेरनिवड झाल्यावर ट्विट करून अभिनंदन केले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत गिरीश महाजन यांनी नार्वेकर यांच्या नाराजीवर बोट ठेवलं आहे.

नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधानही गिरीश महाजन यांनी केलं आहे.