पिंपरी दि. २१ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहरातील दैनंदिन 100 किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाबाबत घाई करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेता या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला केली. त्यामुळे सोसायटी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची व्यवहार्यता तपासण्यासाठी नागरिक आणि अधिका-यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रथमच आज (शुक्रवारी) पिंपरी पालिकेत आले. आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विविध प्रश्न समजावून घेतले. यावेळी भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी सभागृह नेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घेता घाई करण्याची आवश्यकता नाही. आता त्या विषयाला स्थगिती द्यावी असे सूचविले आहे. नव्याने निर्माण होणा-या गृहनिर्माण संस्थांना ते बंधनकारक करता येईल का याचा विचार करण्याबाबत सांगितले. शाळांना सर्व सोयी-सुविधा देवू पण विद्यार्थ्यांचा पट वाढला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न समजावून घेतला. शहरातील प्रश्नांसाठी दरमहा एक बैठक घेणार आहे.
‘मागच्या टर्ममध्ये मी केवळ तीन ते चार महिन्यांसाठी पुण्याचा पालकमंत्री होतो. आता मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो असलो तरी जिल्ह्यातील विषय समजून घेत आहे. पुणे, पीएमपीएमलचा आढावा झाला. आज पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि पीएमआरडीएचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.