रा.स्व.संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात दीपावली स्नेहमिलन

0
252

पिंपरी, दि.२१ (पीसीबी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने दीपावलीच्या शुभ पर्वावर शहरातील विविध भागात पाच ठिकाणी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी रा.स्व.संघातर्फे प्रकाशपर्वाच्या निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रमात नागरिकांसाठी वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक,सेवा यांसह कला – क्रीडा ,विज्ञान, साहित्य क्षेत्रातील नामवंत वक्ते, तज्ञ सहभागी होत असतात. या वर्षी देखील शहरात रा.स्व.संघ देहू, आळंदी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी गटा तर्फे खालील पाच ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

▪️ चिखली (टाळगाव) – इंद्रप्रस्थ सभागृह, पाटील नगर येथे दि.२२ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता प्रमुख वक्ते ह.भ. प. भागवताचार्य शंकर महाराज शेवाळे(वारकरी संप्रदाय महाराष्ट्र) हे ‘अवघाचि संसार सुखाचा करीन ‘ या विषयावर प्रबोधन करणार आहेत.

▪️ चऱ्होली
– साईराज मंगल कार्यालय, काळे कॉलनी येथे रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता रा.स्व.संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसता गतिविधी प्रमुख अभय ठकार हे ‘कौटुंबिक संस्कार’ या महत्वपूर्ण विषयावर उद्बोधन करतील.

◼️ संत तुकाराम नगर – आचार्य अत्रे सभागृह येथे रविवार दि.२३ ऑक्टोबर सकाळी ७.३० वाजता ‘सुदृढ कुटुंब व्यवस्था – सक्षम समाजाचा पाया’ या विषयावर कल्याण आश्रमाचे गोवा प्रांत संघटन मंत्री दिनकर देशपांडे आपले मौलिक विचार मांडतील.

◼️ काळेवाडी (चिंचवड) – रागा पॅलेस, एम्पायर इस्टेट पुलाजवळ ,विजयनगर येथे रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता ज्ञानप्रबोधिनी युवक संघटन विभाग संयोजक नचिकेत निस्तुरे ‘भारताचे प्राचीन विज्ञान’ हा विषय उलगडणार आहेत

◼️ निगडी प्राधिकरण – पाटीदार भवन, सेक्टर २६, प्राधिकरण येथे शनिवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता ‘भारतीय संस्कृतीचा प्रभाव’ या विषयावर राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहसंयोजिका (महिला समन्वय) भाग्यश्री साठ्ये मार्गदर्शन करणार आहेत.

सेवा कार्यासाठी कायम तत्पर असलेल्या संघ स्वयंसेवकांकडून सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या जनजाती कल्याण आश्रमाच्या विद्यार्थी तसेच बंधू भगिनींकरिता फराळाचे देखील संकलन करण्यात येणार आहे. दीपावलीच्या या तेजोमय वैचारिक पर्वात सर्व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन रा.स्व संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.