हॉस्पिटलवर दरोडा टाकण्यासाठी शस्त्र घ्यायला आलेल्या सहा जणांना अटक

0
434

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – अहमदनगर येथे पोळ हॉस्पीटलमधील डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा कट सहा जणांनी रचला. त्यासाठी ते पिस्तुलातील काडतुसे घेण्यासाठी गहुंजे येथे आले. मात्र काडतुसे न मिळाल्याने दुसरे पिस्तूल आणि काडतुसे घेत असताना शिरगाव परंदवडी पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) सायंकाळी गहुंजे येथे करण्यात आली.

पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय 29, रा. वाकड), आफताब मेहबुब शेख (वय 21 रा. वाकड), रुपेश राजेश गायकवाड (वय 21, रा. चिंचवड), शुभम लक्ष्मण दाते (वय 19, रा. चिंचवड), सचिन बबन जायभाये (वय 24, रा. शेवगाव, अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय 20, रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक समीर घाडगे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथेही चौंडाई माता मंदिराजवळ काहीजण शस्त्र खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिरगाव परंदवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवार (दि. 16) रात्री साडेआठ पासून परिसरात सापळा लावला. आरोपींनी त्यांचा साथीदार साहिल याला गहुंजे येथे पिस्तुलातील जिवंत काडतुसे खरेदी करण्यासाठी पाठवले. मात्र त्याला जिवंत काडतुसे मिळाली नाहीत. त्यामुळे आरोपींनी दुसरे पिस्टल आणि काडतुसे खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी ओरपींनी जगन सेनानी याला फोन पे द्वारे 20 हजार रुपये पाठवले. तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे चौकशी केली असता ते अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटल मधील डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणार होते. हॉस्पिटलवर दरोडा टाकण्याचा आरोपींनी कट रचला होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले तपास करीत आहेत.