आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचा कामाला गती मिळणार; आढावा समिती गठीत

0
216

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – आंद्रा, भामा-आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणण्याचा प्रकल्पाला गती मिळणार आहे. त्यासाठी आयुक्त शेखर सिंह प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, नगररचना विभागाचे उपसंचालक आणि प्रकल्प सल्लागार असणार आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्वकांक्षी असलेला आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. या प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग, देहूगाव नगरपंचायत यांच्या हद्दीतून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. या प्रकल्पाची विहीत कालमर्यादेत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय राखणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच जणांच्या समितीची स्थापना केली आहे.

ही समिती आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाशी संबंधित कामाचा, उद्भवणा-या अडचणींचा आढावा घेईल. त्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. समिती अध्यक्षांच्या संमतीने महापालिकेच्या इतर विभागप्रमुखांना समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याची मुभा असेल. तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण होईल याची समितीने दक्षता घ्यावी. प्रकल्पाशी संबंधित केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी आयुक्तांना अवगत करावा असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.