देशभर पाऊस पडण्याची शक्यता; तीव्र थंडीची लाट येणार ?

0
242

पुणे, दि. १९ (पीसीबी) : हिंद महासागर आणि प्रशांत महासागरातील तापमानाच्या प्रतिकूल परिणामामुळे देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अधूनमधून कमी दाबाचे पट्टे, चक्रीय स्थिती तयार होऊन देशभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीतच तीव्र थंडीची लाट येणार असल्याचा निष्कर्ष दक्षिण आशियाई हवामान तज्ज्ञांच्या परिषदेत काढण्यात आला आहे.दक्षिण आशियाई हवामान तज्ज्ञांची परिषद नुकतीच पार पडली. यामध्ये आशिया खंडातील भारत, जपानसह इतर सात देशांतील नऊ हवामान संस्थांनी सहभाग घेतला होता. यात त्यांनी दक्षिण आशियाई खंडातील ऑक्टोबर ते डिसेंबरमधील हवामानावर चर्चा केली. या कालावधीत प्रशांत महासागर व हिंद महासागरातील तापमान व विविध सांख्यिकी मॉडेलचा आधार घेत दीर्घ पल्ल्याचा अंदाज व्यक्त केला.

महाराष्ट्रात एकाचवेळी थंडी, पाऊस : हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत होणार असल्याचे सूतोवाच या परिषदेत केले आहे. या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

‘ला-निना’ स्थिती वर्षअखेरपर्यंत राहणार : प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ स्थिती पुढील काळात कायम राहण्याची शक्यता आहे. तर हिंद महासागरात देखील ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नकारात्मक स्थिती कायम राहणार आहे. याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत झाले नाही. तरीही बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दक्षिण आशियातील पृष्ठभागांच्या तापमानावर प्रतिकूल परिणाम होतो. सप्टेंबर 2020 मध्ये ‘ला-निना’ ची स्थिती तयार झाली होती. अशी स्थिती डिसेंबर 2022 पर्यंत कायम राहणार आहे.

दक्षिण आशियाई देशातील हवामान तज्ज्ञांची दोन दिवसीय ऑनलाईन परिषद नुकतीच झाली. त्यात पुण्यातील हवामान विभागाच्या वतीने सहभागी झालो होतो. यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील हवामानाचा अंदाज सर्वांनी घेतला. देशातील बहुतांश भागात थंडी व पाऊस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून थंडी देखील तीव्र राहील. दक्षिण भारतात 40 टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता आहे. -.