एसटी बसच्या तिकीट दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; प्लॅटफॉर्मवर आणली रिक्षा

0
241

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – ”राज्य सरकार मस्त जनता त्रस्त”, “खासगी बस चालकांना शंकरपाळी, सामान्य नागरिकांनी दिली महागाईची दिवाळी”, “एसटी दरवाढ रद्द झालीच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देत एसटी तिकीट दरवाढ केल्याच्या विरोधात वल्लभनगर आगारातील एसटी प्लॅटफॉर्मवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध आंदोलन केले. ऑटो रिक्षा एसटी प्लॅटफॉर्मवर लावून चला पिंपरी-चिंचवड ते ठाणे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर एसटी तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दरवाढीच्या निषेधार्थ युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वल्लभनगर एसटी स्टँड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन घेण्यात आले. संगीता कोकणे, मीरा कदम,समिता गोरे,उज्वला शिंदे , युवक विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, उपाध्यक्ष रोहित वाबळे, अमोल रावळकर, दिनेश पटेल, मंगेश बजबळकर, युवक सरचिटणीस दीपक गुप्ता, स्वप्निल गायकवाड, सागर वाघमारे, युवा नेते राहुल पवार, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला, ओम शिरसागर अनुज देशमुख, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, मयूर खरात, तुषार ताम्हणे, कामगार नेते युवराज पवार, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना गरिबांची एलर्जी असून एसी बसची दरवाढ न करता सर्वसामान्यांची लाईफ लाईन असणारी लालपरी साधी बसचे तिकीट दरामध्ये वाढ केली. याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. खरतर राज्य सरकारने चौपट भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस धारकांना धारेवर धरायला पाहिजे होते आणि गैरप्रकारे वाढवलेले तिकीट यावर अंकुश लावायला पाहिजे होते. तसेच जादा बस सोडून आणि केंद्र सरकार मधील वजन वापरून जादा रेल्वेची व्यवस्था या सणासुदीत करायला पाहिजे होती. परंतु, ते न करता एसटीचे तिकीट वाढवले आहे. यावरून राज्याप्रती त्यांची उदासीनता दिसून येते. दसरा मेळाव्याला 2700 एसटी बस मुख्यमंत्री राज्यातून मुंबईला घेऊन जातात. त्याचा देखील हिशोब महाराष्ट्राला मिळाला पाहिजे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात राज्यातील लाखो लोक व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. प्रत्येक दिवाळी सणानिमित्त हे सर्व लोक एसटी बसने आपापल्या गावी जातात. अशातच सरकारने तिकीट दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं काम एक प्रकारे केला आहे. एक तर प्रचंड महागाई या भाजप सरकारने देशावर व राज्यावर लादली असून त्याचा सामना या देशातील नागरिक कसाबसा करीत आहे. प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. मग ते सुईपासून भाज्या पासून तेलापर्यंत भाववाढ या भाजप सरकारने केली. त्यात अशी एसटी तिकिटाची दरवाढ करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे हा प्रकार भाजप सरकार करत आहे. एसटी तिकीट दरवाढ मागे घेतली नाही. तर, राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेण्यात येईल याचा इशारा गव्हाणे यांनी दिला.