बावधन, दि. १८ (पीसीबी) – पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हृतिक एरंडवणे (वय 22, रा. एरंडवणे गावठाण, पुणे) याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 16) सायंकाळी चांदणी चौक, बावधन येथे करण्यात आली.
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक परिसरात एक सराईत गुन्हेगार येणार असून तो नेहमी स्वतःजवळ शस्त्र बाळगत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हृतिक एरंडवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले. हृतिक याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाचा, डेक्कन पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याच्या तर उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तो मोकामध्ये मागील दीड वर्षांपासून फरार होता. हृतिक विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.