आध्यात्म व मानवतेचा दिव्य संगम – ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम हर्षोल्हासात जोरदार पूर्वतयारी

0
370

– पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येने भक्तगण सेवा कार्यात सहभागी

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – जगभरातील भक्तगणांसाठी आणि प्रभुप्रेमी सज्जनांसाठी वार्षिक निरंकारी संत समागम भक्ती, प्रेम व एकोप्याचे एक असे अनुपम स्वरूप आहे ज्यामध्ये समस्त भक्त सहभागी होऊन अलौकिक आनंदाची प्राप्ती करतात. हीच अखंडित श्रृंखला पुढे नेत सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने प्रभुप्रेमी भक्त सहभागी होऊन सदगुरु माताजींचे पावन आशीर्वाद व अमृतवाणीचा लाभ प्राप्त करतील. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी या संत समागमामध्ये विविध संस्कृती व सभ्यतांचा अनोखा संगम पहायला मिळणार आहे.

वार्षिक निरंकारी संत समागमाची प्रतीक्षा प्रत्येक निरंकारी भक्त मोठ्या आतुरतेने करत असतो. या समागमामध्ये सहभागी होण्याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये कायमच असते. या संत समागमाच्या पूर्वतयारीमध्ये आपला खारीचा वाटा अर्पण करुऩ या दिव्य सेवेचा आनंद प्राप्त करण्याची इच्छाही या भक्तांच्या मनामध्ये साठलेली असते. या वर्षीचा संत समागम स्वयमेव विशेष आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये केवळ ऑनलाईन माध्यमातूनच सर्व भक्तांनी या समागमाचा आनंद प्राप्त केला. या वर्षी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात प्रत्यक्ष रूपात समागमामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होत आहे. मिशनच्या इतिहासामध्ये हा संत समागम सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात मुळीच शंका नाही. कारण या ७५व्या संत समागमाचे आयोजन भव्य आणि विशाल स्वरूपात केले जात आहे.

समागम परिसर आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये जोरदार पूर्वतयारी मागील अनेक दिवसांपासून सुरु झालेली आहे हे सर्वविदित आहे. जवळपासच्या दिल्ली व एन. सी. आर व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यांतूनही संतजन मोठ्या संख्येने पोहचून या सेवेमध्ये आपले योगदान देत आहेत. त्यामध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येने सेवादार भक्त तुकड्या तुकड्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत समागम स्थळावर जाऊन सेवा कार्य करत आहेत. या सेवांमध्ये मैदानांची स्वच्छता, समतलीकरण, ट्रॅक्टर, राजमिस्त्री, महाप्रसाद (लंगर) अशा विभिन्न प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. या सेवांमध्ये आबालवृद्ध भक्तगण नवोन्मेषाने व उत्साहाने सेवा कार्य करत असून या सेवा करण्याचे सौभाग्य बहाल केल्याबद्दल सदगुरु माताजींचे हृदयापासून आभार व्यक्त करत आहेत. वर्तमान काळात युवावर्ग भौतिक जीवनाच्या धावपळीमध्ये व्यस्त आहे. अशा वेळी संत निरंकारी मिशन ब्रह्मज्ञानाचा दिव्य प्रकाश प्रदान करुन युवावर्गाला आध्यात्माशी जोडत आहे. हा संत समागम हे त्याचेच एक जीवंत उदाहरण आहे. संत समागमाच्या सेवेमध्ये समाजाच्या सर्व थरातील लोक जाती-धर्माचे भेदभाव विसरून समागमाच्या उज्वल यशासाठी प्रयत्नशील आहेत.

हा ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम ‘आत्मिकता व मानवता – संगे संगे’ या विषयावर आधारित आहे, ज्यामध्ये जगभरातील वक्तागण, गीतकार तसेच कवी सज्जन आपले प्रेरणादायी भक्तीभाव व्यक्त करतील. आध्यात्मिकतेच्या जाणीवेत आणि आधारावरच मानवतेची भावना अवलंबून आहे. वास्तविक पाहता जेव्हा आपण समर्पित भावाने निराकार ईश्वराशी नाते जोडतो तेव्हा आपल्या अंतरात स्वाभाविकपणेच मानवतेचे भाव दृष्टिगोचर होऊ लागतात, हृदयामध्ये सर्वांसाठी परोपकार व प्रेमाची भावना उत्पन्न होते. सदगुरु माताजींचा हाच दिव्य संदेश आहे, की आध्यात्मिकता आणि मानवता हातात हात घालून चालत राहणे गरजेचे आहे. कारण जीवनामध्ये या भावनांचे आगमन झाल्यानंतरच ते सार्थक ठरते. हाच या दिव्य संत समागमाचा उद्देश आहे.