आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव

0
141

– राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेनेत झालेली अभूतपुर्व बंडाळी आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाचा धसका सर्वच पक्षांनी घेतलेला दिसतो. विविध आमिष आणि ईडीचे धाक दाखवून इतर पक्षातील आमदारांना भाजप आपल्याकडे भरती करून घेत असल्याचा आरोप, विरोधकांडून सातत्याने केला जात होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे,’ असा आरोप पवार यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांच्यावर सीबीआय चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लावण्याचा हेतू तोच असल्याची चर्चा आता राजकिय वर्तुळात रंगली आहे.

पवार म्हणाले, “भाजपने शिवसेना फोडली आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फाडण्याचा भाजपचा डाव आहे.” पवार यांनी भाजपवर थेट वार केल्याने, यावरून आतावाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं डाव, भाजपचं पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
दरम्यान, नुकतेच राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. देसाई म्हणाले, जे आमदार अजित पवारांबरोबर आहेत, ते आमच्याकडे संध्याकाळी येतात, कोणकोण आमच्याकडे काम घेऊन येतो. तेवढं जरा मुख्यमंत्र्यांकडे विषय घेत चला सांगतात. मग आम्ही विचारतो, सगळं करू, पण काय आमच्याकडे येण्याचा विचार? वगैरे अशा गोष्टी होतात. असे देसाई यांनी म्हंटले होते.

राज्य सहकारी बँकेच्या हजार कोटी रुपयेंच्या घोटाळ्याची फाईल बंद झाली होती. आता त्याच संदर्भात अजित पवार यांची चौकशी लावण्यात आली आहे. पवार यांच्या मागे सिंचन घोटाळ्याची चौकशी, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची चौकशी अगोदर सुरू आहे. ईडी ने पवार यांच्यासह त्यांच्या बहिणींच्या निवास व कार्यावयांवर छापे टाकले होते. हा निव्वळ दबाव तंत्राचा भाग असून त्यातून अजित पवार यांचा गट फुटून भाजपला मिळाला की सर्व चौकश्यांची फाईल बंद होईल, असे एका जणाकाराने सांगितले.