खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने व्यापा-यांच्या समस्यांबाबत मंगळवारी पिंपरीत बैठक.

0
140

महापालिका, पोलीस आयुक्त राहणार उपस्थित

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी कॅम्पातील समस्यांबाबत मंगळवारी बैठक
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी कॅम्पातील व्यापायांच्या अडचणी, समस्यांबाबत उद्या मंगळवारी (दि.१८) महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक पोलीस हजर असणार आहेत. या बैठकीत व्यापा-यांना येणा-या समस्यांवर जागेवर तोडगा काढण्यात येणार आहे.

पिंपरी कॅम्पातील बी.टी. आडवाणी हॉलमध्ये मंगळवारी (दि.18) सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहराच्या उपनगरातील नागरिक कॅम्पात खरेदीसाठी येतात. दिवाळीचा सण तोंडावर आहे. त्यामुळे कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहकांची वाहने लावण्यासाठी जागा उपुरी पडते. फुटपाथवर काही विक्रेते बसत असल्याने वाहने लावण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

प्लास्टिकच्या किती मायक्रोमच्या पिशव्या वापरायच्या यावरुनही व्यापा-यांमध्ये संभ्रम आहे. महापालिका अधिकारी कारवाई करतात. त्यावरुन वादाचे प्रसंगही घडतात. यासह व्यापा-यांना येत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला आहे.

खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थित आणि महापालिका, पोलीस अधिका-यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी एकत्रित बैठक होणार आहे. या बैठकीत व्यापा-यांच्या समस्या, प्रश्न, अडचणी सविस्तरपणे समजून घेतल्या जाणार आहेत. समस्यांवर जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले