– सीबीआय चौकशीसाठी रवाना झालेल्या सिसोदियांना अटक होण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सीबीआयच्या कार्यालयाकडे चौकशीसाठी रवाना झाले आहेत. या चौकशीसाठी जाताना मनिष सिसोदिया यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं.सिसोदिया यांनी चौकशीपूर्वी ट्विट करून आपल्या अटकेची भीती व्यक्त केली आहे. मात्र, तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या सर्व नाट्यामधे मनिष सिसोदिया हे नवी दिल्लीत आता अगदी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याच भूमिकेत असल्याची चर्चा रंगली आहे.
सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया आम आदमी पार्टी (आप) कार्यालय आणि राजघाटाला भेट दिली. घरातून बाहेर पडताना त्यांना पत्नीने टिळा लावला. तर मनिष सिसोदिया यांनी आईचे आशीर्वाद घेतले. सिसोदिया यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या घराभोवतीही कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
सिसोदिया यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांच्याविरोधात पूर्णपणे खोट्या केस करण्यात आल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “माझ्या घरावर छापा टाकला, काहीही सापडले नाही, माझे सर्व बँक लॉकर्स पाहिले, काहीही सापडले नाही, माझ्या गावात जाऊन सर्व तपास केला, काहीही सापडले नाही. हे प्रकरण पूर्णपणे खोटे आहे, माझ्या तुरुंगात जाण्याने गुजरातमधील निवडणूक प्रचार थांबणार नाही,”असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
“माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. मला गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी जावे लागले. हे लोक गुजरातमध्ये वाईटरित्या पराभूत होत आहेत. मला गुजरातला जाण्यापासून रोखण्याचा त्यांचा हेतू आहे. गुजरातच्या लोकांना मी म्हटले होते की, दिल्लीसारख्या शाळा तुमच्या मुलांसाठी सुरू करू. मात्र, सत्ताधाऱ्यांना आशा शाळा नको आहेत,”असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
आज प्रत्येक गुजराती उभा आहे. गुजरातची मुलं आता चांगल्या शाळा, हॉस्पिटल, नोकरी, वीज यासाठी प्रचार करत आहेत. गुजरातमध्ये येणारी निवडणूक ही एका आंदोलनाची असेल. माझ्यावर पूर्णपणे खोटा गुन्हा करून मला अटक करण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत मला निवडणूक प्रचारासाठी गुजरातला जायचे होते. हे लोक गुजरातमध्ये वाईटरित्या हरत आहेत. त्यांचा उद्देश मला गुजरात निवडणूक प्रचाराला जाण्यापासून रोखण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.










































