अंधेरी पूर्व पोटनिवडणुकितून भाजप घेणार माघार

0
192

– राज ठाकरे, शरद पवार, प्रता सरनाईक यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांचा निर्णय

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भावनिक आवाहनानंतर भाजप आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा आपल्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये त्यांची चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल की मागे घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक न लढवण्यासाठी राज ठाकरेंचे भाजपला भावनिक आवाहन –
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली आहे.
शरद पवारांचेही आवाहन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असं म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केलं आहे.

शिंदे गटातील आमदारांचेही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी साकडे

शिंदे गटातील काही आमदारांनी देखील एकनाथ शिंदे यांनी ही निवडूक बिनविरोध करावी यासाठी पत्र पाठवले आहेत. शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांनीच पत्र लिहित ही निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी केल्यामुळे भाजपवर दबाव वाढू लागला आहे.