दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खासगी बसची आरटीओकडून तपासणी; तीन वायुवेग पथकांची नियुक्ती

0
360

पिंपरी दि.१५ (पीसीबी) – दिवाळीच्या काळात प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, टप्पा वाहतुकीसह नागरिकांची लूट करणाऱ्या खासगी बसेसची राज्य परिवहन विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आरटीओनेही तीन वायुवेग पथके नेमली आहेत. नियमभंग करणाऱ्या बसेसवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.

दिवाळीच्या सणासाठी अनेक नागरिक आपल्या मूळ गावाकडे जात असतात. गावाकडे जाण्यासाठी काही जण महाराष्ट्र शासनाची लालपरी, शिवनेरी, शिवशाहीने प्रवास करण्यास पसंती देतात. तर, काही जण खासगी वाहनांतून प्रवास करतात. सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा गैरफायदा घेत खासगी बस प्रवाशांकडून अवाच्या सवा दर आकारून लूट करतात. अवाजवी भाडे आकारणाऱ्या चालक-मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. याबाबतचे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. 23 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यभरात बस तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.

परिवहन विभागाच्या या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहर परिसरात तीन वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये दोन मोटार वाहन निरीक्षक, एक सहायक मोटार वाहन निरीक्षक हे अधिकारी आहेत. रात्री आणि पहाटेच्या वेळी या पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. बस तपासणीमध्ये दोषी आढळल्यास संबंधित बसेसवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.