ढाल तलवार चिन्हाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पूजन

0
478

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हे गोठविण्यात आले आणि तूर्तास मशाल हे चिन्ह देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेतर्फे दोनच दिवसांपूर्वी आकुर्डी येथील शिवसेना भवना समोर मशाल घेऊन शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला होता. आता शिंदे गटाच्या वतीने म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना तर्फे त्यांना मिळालेल्या ढाल तलवार या चिन्हाचे आज सकाळी थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थाना समोर जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार बारणे यांच्या हस्ते ढाल तलवारीचे पूजन करण्यात आले.

थेरगाव येथे खासदार बारणे यांच्या बंगल्या समोर मोठ्या संख्येने शिंदे समर्थकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पक्षाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच महिला आघाडीच्या सरिता साने यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार बारणे म्हणाले, खरे तर आम्ही धनुष्यबाण हे चिन्ह मागितले होते, तसा अर्ज निवडणूक आयोगाकडे दिला होता. आता यापुढील काळातही धनुष्यबाण मिळविण्यासाठी आमचा लढा चालू राहणार आहे. न्यायालयिन लढाई सुरूच राहिल, आज निवडूणक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिले त्याचे आम्ही स्वागत करत आहोत.