हिमाचल प्रदेश निवडणुकिचे बिगूल वाजले

0
239

दिल्ली, दि. १४ (पीसीबी) : हिमाचल प्रदेश राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणुकीबाबत घोषणा केली. पहाडी राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, हिमाचलमध्ये १७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल, ज्यामध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. उमेदवारांना २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी मागे घेता येणार आहेत. १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

ऑक्टोबर हा सणांचा महिना आहे, या महिन्याट लोकशाहीचा सणही जोडला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाने गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी विशेष तयारी केली आहे. कोरोना साथीचा धोकाही लक्षात घेऊन, यासाठी तयारी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ ८ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. एकूण ५५ लाख मतदार आहेत. त्यापैकी १५ लाख मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत. तर १.६ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

राजीव कुमार म्हणाले की, मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात नवीन मतदारांची भर पडली आहे. चुका दुरुस्त केल्या आहेत. शहरांमध्ये मतदान वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरणही त्यांनी दिले. जेथे मेट्रो शहरांमध्ये मतदान कमी होते. ज्या भागात पूर्वी कमी मतदान झाले आहे, त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू आहेत. कोणाकडे मतदार ओळखपत्र नसले, तरी ते इतर कागदपत्रांच्या मदतीने मतदान करू शकतात, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

२०१७ मध्ये हिमाचलमधील पक्षीय बलाबल :
६८ जागांच्या हिमाचल विधानसभेची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपत आहे. यापूर्वी राज्यात निवडणुका होणार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४४ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. ३ जागा इतरांच्या राखले होते.