काँग्रेस करणार देगलूर आणि कोल्हापूर उत्तरच्या उपकाराची परतफेड

0
176

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची धाकधूक कायम आहे. ऋतुजा लटके यांनी मुंबई महापालिकेतील लिपीक पदाचा दिलेला राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता येणार की नाही, याबाबत टांगती तलवार आहे. मात्र ठाकरेंच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीतील घटकपक्ष आहेत. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची संधी काँग्रेसकडे आहे.

आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाराजी झटकून कामाला लागण्याचे आदेश आलेत. यापूर्वी महाविकास आघाडी म्हणून लढताना दोन पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती. परिणामी काँग्रेसचे उमेदवार निवडूनही आले. ठाकरेंनी केलेल्या दोन उपकारांची परतफेड करण्याची संधी आता काँग्रेसकडे असल्याची चर्चा आहे. काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्र लढत नसल्याने अंधेरीतील काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा होती, मात्र आता सारे मतभेद विसरुन काँग्रेस नेते एकदिलाने काम करण्याची चिन्ह आहेत.

काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना तिकीट दिलं. एक ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. जितेश अंतापूरकर हे ४१ हजार ९३३ मतांनी विजयी झाले. भाजपच्या सुभाष साबणेंचा त्यांनी पराभव केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेना काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तर नाराज साबणेंनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत उमेदवारी दाखल केली. मात्र काँग्रेसने गड राखला, तर भाजपला पराभवाचा फटका बसला.

दुसरीकडे, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर दोन एप्रिल २०२२ रोजी पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवार घोषित केले. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तिथेही जयश्री जाधव यांचा विजय झाला, तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला.