– ‘ड’ श्रेणीतील सफाई व इतर संवर्गात सर्वाधिक २१८२ पदे रिक्त; माहिती अधिकारातून उघड
– माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांची माहिती
पिंपरी दि.१२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शासकीय विभागातील तब्बल ४ हजार ३६८ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना हि माहिती प्रशासन विभागाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच दर महिन्यास किमान ५० ते १०० अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर तसेच स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल ४ हजार ३६८ इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारामुळे उघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाद्वारे कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाकडे दि.०१/०९/२०२२ रोजी माहिती अधिकाराचा अर्ज सादर करत महापालिकेतील आकृतीबंधाच्या मंजुरीनुसार विविध विभागातील ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीतील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती मागितली होती. प्रशासन विभागाने दिपक खैरनार यांना ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीतील दि.३१/०३/२०२२ अखेर पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीत एकूण ३५६ संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या ११,५१३ इतकी आहे. त्यापैकी ७,१२४ इतकी पदे भरली आहेत. तर ४ हजार ३६८ इतकी पदे रिक्त आहेत. ‘अ’ श्रेणीत एकूण १२१ संवर्ग आहेत तर त्यात २८१ पदे मंजूर असून त्यापैकी १६५ पदे भरलेली असून ११६ पदे रिक्त आहेत. ‘ब’ श्रेणीत एकूण ४७ संवर्ग आहेत तर त्यात ३२४ पदे मंजूर असून त्यापैकी २०७ पदे भरलेली असून ११७ पदे रिक्त आहेत. ‘क’ श्रेणीत एकूण १५४ संवर्ग आहेत तर त्यात ५३५० पदे मंजूर असून त्यापैकी ३३९७ पदे भरलेली असून १९५३ पदे रिक्त आहेत. ‘ ड-इतर’ श्रेणीत एकूण २७ संवर्ग आहेत तर त्यात २९६५ पदे मंजूर असून त्यापैकी १७२४ पदे भरलेली असून १२४१ पदे रिक्त आहेत. ‘ ड-सफाई संवर्ग’ श्रेणीत एकूण ०७ संवर्ग आहेत तर त्यात २५९३ पदे मंजूर असून त्यापैकी १६५२ पदे भरलेली असून ९४१ पदे रिक्त आहेत.
● रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई व नागरिकांना नाहक त्रास
पिंपरी चिंचवड महापालिकेने सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रतिकार केला असला, तरीही रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. पिंपरी महापालिकेत अत्याधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, कंत्राटी पद्धतीने उपलब्ध मनुष्यबळात नियमित कामांचा गाडा ओढला जात आहे. मात्र, पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई होते यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने हि रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता आहे.
– दिपक खैरनार ( माहिती अधिकार कार्यकर्ते )