एकनाथ शिंदे गटाचा रडिचा डाव, आता ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न

0
271

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : महाविकास आघाडीच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काम सुरू केले असले तरी भाजपने त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित केली नसल्याचे समजते.

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केल्याने त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. लटके जर हयात असते, तर ते आपल्याबरोबरच आले असते, असा शिंदे गटाचा दावा आहे. उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केल्याने आपण निवडणूक लढवू नये, असेही शिंदे गटातील काही नेत्यांचे मत होते. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी आपल्या पक्षात यावे आणि त्यांना शिंदे गट व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करीत आहेत. ऋतुजा लटके शिवसेनेतून फुटून शिंदे गटाकडे आल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे.

ऋतुजा लटके या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्या वेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते हजर असतील, असे शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले आहे. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचे ठरविले असून मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनही नुकतेच केले. युतीचे उमेदवार पटेल यांना जनतेचा चांगला पाठिंबा असल्याचे शेलार यांनी त्या वेळी सांगितले होते. मात्र लटके यांना आपल्या पक्षाकडे वळविण्याचे शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याने अजूनही पटेल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा भाजपने केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे. ऋतुजा या पालिकेत कर्मचारी असून त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय त्यांना निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर करू नये याकरिता शिंदे गटाने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर दबाव आणल्याचे समजते.

ऋतुजा या पालिकेच्या अंधेरीतील के पूर्व कार्यालयात कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर व्हावा याकरिता शिवसेनेनेही सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सोमवारी पालिका मुख्यालयात शिवसेनेचे काही पदाधिकारी ठाण मांडून बसले होते.

दरम्यान, महापालिकेच्या सेवाशर्ती नियमावली १९८९ नुसार एखाद्या व्यक्तीला स्वेच्छानिवृत्ती हवी असेल तर तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते आणि राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. एक महिन्याची नोटीस नाही दिली, तर एक महिन्याचे मूळ वेतन जमा करावे लागते असा उपनियम आहे. तसेच आयुक्त आपल्या अधिकारात परवानगी देऊ शकतात. मात्र ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला असून एक महिन्याचा कालावधी पूर्ण न केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के पूर्व विभागातून ना हरकत मिळवली असून मूळ वेतनाची ६७ हजार ५९० रुपये ही रक्कम पालिकेच्या कोषागारात भरली असल्याचे समजते. मात्र ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.