मालमत्ता हस्तांतरण आजपासून ऑनलाईन

0
552

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – कर संकलन विभागाच्या लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचीत केलेल्या 12 सेवांपैकी 7 सेवा या पूर्वीच ऑनलाईन केलेल्या आहेत. उर्वरीत 5 सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा आजपासून 100 टक्के ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त या सेवांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच उर्वरीत 4 सेवा या 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन करण्याचा मानस त्यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना जलद गतीने सेवा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. या ऑनलाईन सेवेच्या समारंभा बरोबरच नियमित व प्रामाणिक कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला फी नि:शुल्क करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींचे मालमत्तांना 30 जूनपूर्वी देय सवलतीचा लाभ आता संपूर्ण वर्षभर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन आकारणी होणा-या मालमत्ता कर सवलत योजनापासून वंचित राहत होत्या. त्यांना देखील सवलत योजना लागू केल्या आहेत. याशिवाय नागरिकांना एकात्मिक व परस्पर बिल पेमेंट सेवा देण्याच्या उद्देशाने BBPS द्वारे पैसे भरणा करण्याची सुविधा आजपासून सुरु करण्यात येत असल्याचेही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखलाही ऑनलाइन पद्धतीने काढण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महापालिका दहा रूपये आकारणी करत होती. महापालिका वर्धापन दिनापासून नियमित व प्रामाणिक कर दात्यांसाठी आपुलकी व विश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने दाखला नि:शुल्क देण्यात येणार आहे.

दिव्यांग नागरिकांच्या मालमत्ता करात सवलत
दिव्यांग व्यक्तींच्या मालमत्तेला सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना सवलतीचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपूर्वी कर भरण्याची मुदत होती. महापालिका वर्धापन दिनापासून दिव्यांग नागरिकांची मागणी व त्यांचे प्रती सदभावना विचारात घेऊन वर्षभर कधीही कर भरल्यास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

चालू वर्षातील नवीन मालमत्तांना सामान्य करात सवलत

यापूर्वी 1 एप्रिल रोजी आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तांना 30 जूनपूर्वी सामान्य कर सवलतीचा लाभ देय होता. चालू आर्थिक वर्षात नव्याने आकारणी व नोंदणी होणा-या मालमत्ता सामान्य करातील सवलत योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते. मात्र आता चालू आर्थिक वर्षापासून अशा मालमत्तांना बिल निर्गतीपासून 3 महिन्यात किंवा 31 मार्चपूर्वी संपूर्ण कर भरल्यास सामान्य कर सवलत योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

कर भरण्यासाठी GPay, PhonePay, Paytm यासारख्या Wallets ची सुविधा

BBPS द्वारे विविध Wallets चा वापर तसेच कार्यालय ठिकाणी व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता नागरिकांना एकात्मिक व परस्पर बिल पेमेंट सेवा देण्याच्या उद्देशाने BBPS द्वारे पैसे भरणा करण्यासाठी विविध Wallets मार्फत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये GPay, PhonePay, Paytm यासारख्या Wallets ची सुविधा असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही नेहमीच लोकभिमुख सेवा देण्यासाठी अग्रेसर आहे. सामान्य जनतेला देण्यात येणा-या सेवा या जास्तीत जास्त पारदर्शी व गतीमान पध्दतीने देण्याचा महापालिकेचा मानस असतो. या ध्येयाला अनुसरुनच कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व सेवा या ऑनलाईन करण्याचा निर्धार महापालिकेने केलेला आहे. कर संकलन विभागाच्या लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचीत केलेल्या 12 सेवांपैकी 7 सेवा या पूर्वीच ऑनलाईन केलेल्या असून आजपासून उर्वरीत 5 सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा आजपासून 100 टक्के ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे. उर्वरीत 4 सेवा या 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.