-यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा सत्कार
पिंपरी दि. ९(पीसीबी) -पुणे :अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’संस्थेतर्फे रविवारी ‘वृक्ष संवाद २०२२’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा, सह्याद्री देवराई ‘संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा आणि सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला मदत करणाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला
. देशी वृक्षांच्या बियांच्या वृक्षांची थैली भेट देण्यात आली.९ ऑकटोबर,रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवड येथे हा कार्यक्रम झाला.’सह्याद्री देवराई’संस्थेच्या सदस्यांकरिता होता.देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील,अभिनेते सयाजी शिंदे,लेखक अरविंद जगताप,डॉ चंद्रकांत साळुंखे,सतीश आवटे यांनी मार्गदर्शन केले.श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे , विजय निंबाळकर, मधुकर फल्ले यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सभागृहात उपस्थित होते.
निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सचिन चंदन यांनी केले.’महाराष्ट्रात ‘सहयाद्री देवराई ‘ च्या सहकाऱ्यांच्या योगदानाने महाराष्ट्रात वृक्ष लागवड वाढत आहे.वन विभागाचे सहकार्य वाढत आहे. संस्थेच्या वतीने पुण्यात देवराई करणार आहोत. सीड बँक करणार आहोत ‘, असे सयाजी शिंदे यांनी सांगीतले.
अरविंद जगताप यांची ‘मुळांचे कुळ घेऊ,खोडांचे बळ होऊ,झाडाचे गुण घेऊ,झाडाचे गुण गाऊ ! ‘ ही कविता सयाजी शिंदे यांनी भाषणादरम्यान सादर केली.अरविंद जगताप म्हणाले, ‘सह्याद्री देवराई ‘ ही संस्था वृक्ष हीच सेलिब्रिटी मानून काम करते. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ , स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकत्र करून वृक्ष लागवडीची चळवळ पुढे नेली जात आहे.
आपल्या आवारात, दारात, उद्यानात , गावात झाडं वाढवा. प्रत्येक डोंगर झाडांसाठीच असतात, असे नाही कारण काही डोंगर गवतांचे असतात.राहुल पाटील म्हणाले, ‘जे कोणी वृक्ष लावतात, वाढवतात ते सर्व वृक्षसंरक्षक असतात. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून हे मोठे काम महाराष्ट्रात उभे राहत आहे.मंचावरील कुंडीतील झाडाला अध्यक्षपदाचा मान देऊन आगळा पायंडा या कार्यक्रमाद्वारे पाडण्यात आला.
www.sahyadridevrai.org यासंकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या, सयाजी शिंदे यांच्या आवाजातील गीताचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.संस्थेने महाराष्ट्रात १० लाख वृक्ष लागवड केल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.