त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू

0
491

मुंबई , दि.९(पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीला दिली आहे. १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा वापर केला होता.

दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तज्ज्ञांकडून शिवसेनेला चिन्हाबाबत सूचना करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असलेल्या चिन्हांपैकीच एका चिन्हाचा शिवसेना विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव ठाकरे, ‘शिवसेना प्रबोधन ठाकरे’ असे नाव पक्षांतर्गत नेत्यांनी पक्षासाठी सुचवले असल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.